वर्षा मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद...
स्पर्धेत यंदा तीन हजार स्पर्धकांची हजेरी
पालघर: पालघर नगरपरिषच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नगराध्यक्ष वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत यंदा तीन हजार स्पर्धकांनी हजेरी लावली होती. ११ गटांत झालेल्या या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांसह, तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या स्पर्धेतील सर्वात लांब अंतर असलेल्या दहा किलोमीटरच्या स्पर्धेत शैलेश गांगोडा याने प्रथम क्रमांक पटकावला.
पालघर नगरपरिषदेतर्फे नगराध्यक्ष मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन क्रीडा शिक्षण व सांस्कृतिक समितीमार्फत आयोजन केले होते.जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी झेंडा दाखवून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात केली. यावेळी नगराध्यक्ष उज्वला काळे, उपनगराध्यक्ष उत्तम घरत क्रीडा व शिक्षण समितीचे सभापती चंद्रशेखर वडे, गटनेता कैलास म्हात्रे, भावानंद संखे व नगरपरिषदेतील नगरसेवक नगरसेविका यांच्यासह उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हानमाने, जिल्हा वाहतूक शाखेचे नियंत्रक आसिफ बेग, तालुका क्रीडा अधिकारी भक्ती आंबरे, पालघर नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी, पत्रकार आदी यावेळी उपस्थित होते.
या शर्यतीत शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ, महिला, यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला होता. स्पर्धेतील विविध गटांत एकूण तीन हजार स्पर्धकांनी हजेरी लावली होती. यावेळी हुतात्मा चौकपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत १० किलोमीटरच्या स्पर्धेत वनविभागात कार्यरत असलेला शैलेश गांगोडा याने पहिला क्रमांक पटकवला, तर दुसरा क्रमांक सचिन गोविंद याने पटकावला. तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध गटांतील मुला-मुलींच्या स्पर्धेत उत्तम कामगिरी बजावली. महिलांच्या खुल्या गटात जयश्री पुजारा यांनी प्रथम, तर सोमय्या राव यांनी दुसरा क्रमांक पटकावला. ज्येष्ठांच्या गटात विलास ठाकूर यांनी प्रथम, तर विठ्ठल संखे यांनी दुसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत तरुणांचा उत्साह वाढवत ज्येष्ठांनी चांगली कामगिरी बजावली. प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांना पदक, मानचिन्ह व रोख रक्कम असे पारितोषिक नगर परिषदेच्या विविध मान्यवरांतर्फे वाटप केले गेले.

No comments: