test

'पाणलोट यात्रेच्या' माध्यमातून पाणलोट विकासाची चळवळ उभारणार - मा.ना. संजयभाऊ राठोड

'पाणलोट यात्रेच्या' माध्यमातून पाणलोट विकासाची चळवळ उभारणार - मा.ना. संजयभाऊ राठोड 


मुंबई: मृद व जलसंधारण मंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड यांनी विभागाचे अधिकारी व विविध संस्थांचे प्रमुख व प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला.यावेळी विभागातील विविध प्रकल्प, कामकाज आणि ‘पाणलोट यात्रेची’ अंमलबजावणी याबाबत सविस्तर आढावा घेत आवश्यक त्या सूचना त्यांनी केल्या.

राज्याला पाण्याच्या क्षेत्रात समृद्ध व शाश्वत उपाययोजना करण्यासाठी जलसंधारण विभागाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. पाणलोट प्रकल्पांविषयी जनजागृती निर्माण करणे, थेट शेतकऱ्यांना या विषयाबद्दल शिक्षित करणे, तसेच लोकांमध्ये पाणलोट प्रकल्पांविषयी आपुलकीची भावना निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत ‘पाणलोट रथयात्रे’ चे आयोजन करण्यात येणार आहे. ही रथयात्रा जानेवारी 2025 मध्ये आयोजित केली जाणार असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून या योजनेविषयी व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये 140 प्रकल्प कार्यरत असून त्याचे क्षेत्र 5.65 लाख हेक्टर एवढे आहे. यासाठी केंद्र व राज्य शासन असे 60:40 यानुसार निधीचे प्रमाण असणार आहे. ‘पाणलोट रथयात्रे’ च्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पाणलोट प्रकल्पांचे महत्त्व समजावून सांगण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती अधिक समृद्ध करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून गावागावात जनचळवळ उभारून जनतेच्या सहकार्याने पाणलोट शाश्वत विकास होण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

या बैठकीला मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील, उपसचिव मृदुला देशपांडे, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी श्री.कलशेट्टी, मुख्य अभियंता विजय देवराज, अवर सचिव प्रकाश पाटील, देवेंद्र भामरे, याचबरोबर दूरदृश्य प्रणालीद्वारे पोपटराव पवार आणि विविध संस्थांचे प्रमुख व प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.